महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मा. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या वतीने करण्यात आले.
या मूल्यमापनाचे निकाल प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जाहीर करण्यात आले.
या मूल्यमापनात महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये अमरावती महानगरपालिकेने २०० पैकी १७९.५० गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी महानगरपालिकेच्या डिजिटल प्रशासन, तांत्रिक कार्यक्षमता आणि सेवा वितरणातील प्रगतीचे द्योतक ठरली आहे.
QCI कडून करण्यात आलेल्या या सर्वंकष मूल्यमापनात सात प्रमुख निकषांवर कामगिरी तपासण्यात आली.
यामध्ये महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, शासकीय कामकाजात AI व Blockchain चा वापर तसेच GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश होता.
या सर्व निकषांवर अमरावती महानगरपालिकेने उत्कृष्ट अंमलबजावणी करत ई-गव्हर्नन्स क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.) यांच्या सक्षम नेतृत्वाखाली डिजिटल उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रयोग आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत QCI तर्फे विकसित करण्यात आलेल्या स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलवर संबंधित माहिती व कार्यप्रगती सादर करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक छाननीनंतर QCI कडून सखोल मुलाखती व प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्यात आले.
अमरावती महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रम, तांत्रिक वापर आणि प्रत्यक्ष परिणामांच्या आधारे अंतिम क्रमवारी निश्चित करण्यात आली.
या यशाबाबत प्रतिक्रिया देताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या, “महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, सुलभ व नागरिकाभिमुख करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक दर्जेदार आणि प्रभावी सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या यशामागे ई-गव्हर्नन्स क्षेत्रात राबविण्यात आलेल्या ‘माय अमरावती’ व्हॉट्सॲप चॅटबॉट व चॅनलद्वारे नागरिकांशी थेट संवाद, रिमोट सेन्सिंगवर आधारित ‘कूल रूफ’ उपविधी २०२५, GIS व ड्रोन मॅपिंगद्वारे सुधारित मालमत्ता कर मूल्यांकन, स्वच्छता वॉर रूम, ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी तसेच Government Process Re-engineering या उपक्रमांचा मोठा वाटा आहे.
मोठ्या महानगरपालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी स्पर्धा करत मिळवलेला हा पाचवा क्रमांक अमरावती महानगरपालिकेसाठी अभिमानास्पद असून, डिजिटल प्रशासनाच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळ देणारा ठरला आहे.
