महानगरपालिका आयुक्तांची शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व अतिक्रमणावर कठोर कारवाईचे निर्देश

शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व नागरिकांसाठी सुयोग्य राहावे यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सातत्याने ठोस उपाययोजना राबवत असून, त्या अनुषंगाने आज अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील शुक्रवार बाजार, सुंदरलाल चौक, शुक्रवार बाजारातील मटन मार्केट, महादेवखोरी तसेच ऑक्सिजन पार्क या महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान आयुक्तांनी स्वच्छता स्थिती, कचरा संकलन व व्यवस्थापन, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण, तसेच नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधा यांची बारकाईने तपासणी केली.

संबंधित विभागांचे अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी कामकाजाबाबत स्पष्ट सूचना देत जबाबदाऱ्या निश्चित केल्या.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले.

दंडात्मक कारवाईबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

विशेषतः शुक्रवार बाजारातील मटन मार्केट परिसरात झालेल्या अनधिकृत अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन, सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित तपासणी, सतत निरीक्षण व प्रभावी नियंत्रण यंत्रणा राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच महादेवखोरी व ऑक्सिजन पार्क परिसरात स्वच्छता राखणे, सार्वजनिक जागांची निगा राखणे व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे यावर विशेष भर देण्यात आला.

शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ, अतिक्रमणमुक्त व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने कार्य करावे, असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

शहर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, नियमांचे पालन करावे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top