अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांची शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सखोल भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर विशेष भर

नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी रुक्मिणी नगर येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सविस्तर भेट देत केंद्रातील आरोग्यविषयक कामकाजाचा सखोल आढावा घेतला.

या भेटीदरम्यान आयुक्त महोदयांनी केंद्रामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांची माहिती घेतली. लसीकरण सत्रांचे नियोजन, अंमलबजावणी व उपलब्धता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बालके, माता व गर्भवती महिलांसाठी आवश्यक असलेल्या सर्व लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी खात्री केली.

लसींचा साठा, वितरण व्यवस्था तसेच नोंदणी प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

तसेच केंद्रातील औषधी साठा व औषध पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना आयुक्त महोदयांनी आवश्यक व अत्यावश्यक औषधे सातत्याने उपलब्ध ठेवण्यावर भर दिला.

औषध वितरण करताना गुणवत्ता, पारदर्शकता व नियमानुसार कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य तपासण्या, उपचार सेवा व जनजागृती उपक्रमांचीही सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

भेटीदरम्यान केंद्रातील स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन तसेच परिसरातील एकूणच स्वच्छतेची पाहणी करण्यात आली.

शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र स्वच्छ, सुरक्षित व नागरिकांसाठी अनुकूल वातावरणात कार्यरत राहावे, याबाबत आयुक्त महोदयांनी विशेष भर दिला.

यावेळी आयुक्त महोदयांनी केंद्रातील सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा अधिक प्रभावी, वेळेत व संवेदनशीलतेने देण्याबाबत मार्गदर्शन केले.

नागरिकांशी संवाद साधताना सौजन्य, आपुलकी व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सेवा देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

याशिवाय महानगरपालिकेमार्फत नव्याने उभारण्यात आलेल्या पोर्टा केबिनद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचाही आढावा आयुक्त महोदयांनी घेतला.

सदर केंद्रांमधील आवश्यक सोयी-सुविधा, अंतर्गत रचना व कामकाजाची तयारी तपासून नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रांचे कामकाज तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top