अमरावती महानगरपालिकेतर्फे शुक्रवार बाजार परिसरात दहा वर्षांतील ऐतिहासिक व निर्णायक संयुक्त कारवाई राबविण्यात आली.
मा. आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट आदेशानुसार अवघ्या २४ तासांच्या आत नियोजनबद्ध धडक मोहिम हाती घेण्यात आली असून या कारवाईमुळे शुक्रवार बाजार परिसराने अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे.
शुक्रवार बाजार परिसरातील अधिकृत व अनधिकृत गाळेधारक तसेच दुकान मालकांची तपासणी केली असता मास विक्रीसाठी कोणालाही अधिकृत परवाना देण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आले.
महानगरपालिकेच्या संकुलामध्ये ३९ दुकानदारांना अधिकृत दुकाने दिलेली असतानाही, परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करून अतिक्रमण करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी संबंधित सर्व गाळेधारक, दुकानदार तसेच पशुवैद्यकीय विभागामार्फत मास विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
त्यानंतर दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पशुवैद्यकीय विभाग, अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग तसेच फेजरपुरा पोलीस स्टेशन यांच्या पोलीस संरक्षणात व्यापक व संयुक्त कारवाई करण्यात आली.
या धडक मोहिमेदरम्यान सुमारे ५० वाहने हटविण्यात आली असून २० दुकानांचे अतिक्रमण काढून टाकण्यात आले. तसेच सागर नगरकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः मोकळा करण्यात आला, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे.
या कारवाईचा सर्वात सकारात्मक व नागरिकाभिमुख परिणाम म्हणजे शुक्रवार बाजार परिसरातील सुमारे ३०० ते ४०० भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी योग्य, नियोजित व सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात आली.
यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था, स्वच्छता तसेच नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र दिसून आले आहे.





