मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी मोठा उपक्रम | ३१८ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे; ४६२ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ उपचारासाठी संदर्भ

अमरावती महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम साधणारे पाऊल उचलण्यात आले आहे.

मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्य तपासणी उपक्रमाचा सविस्तर आढावा महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीआरोग्याची वेळेत तपासणी, योग्य उपचार व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

दिशा आय फाउंडेशन या नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने अमरावती महानगरपालिकेतील सर्व मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली.

या तपासणीत ३१८ विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळून आला असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या देखरेखीखाली संबंधित सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

तसेच तपासणीदरम्यान ४६२ विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अथवा विशेष उपचारांची आवश्यकता असलेले नेत्रविकार आढळून आले. अशा विद्यार्थ्यांना पुढील तपासणी व उपचारांसाठी तज्ज्ञ नेत्ररोग विभागांकडे संदर्भित करण्यात आले आहे.

यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती, जिल्हा प्रारंभिक तपासणी केंद्र (DEIC), पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती तसेच आचार्य विनोबा भावे रुग्णालय व संशोधन केंद्र, सावंगी (मेघे), वर्धा या प्रमुख आरोग्य संस्थांचा समावेश आहे.

दरम्यान, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत कार्यरत पथकांमार्फत करण्यात आलेल्या इतर आरोग्य तपासण्यांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तपासणीदरम्यान जीवनसत्त्वांची कमतरता, रातआंधळेपणा, जन्मजात व्यंग, लहान-मोठ्या शस्त्रक्रियेची गरज, हृदयविकार, तसेच कान-नाक-घसा व श्रवणविषयक समस्या आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित करण्याचे निर्देश देण्यात आले.

विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अमरावती महानगरपालिका व संबंधित वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

या उपक्रमामुळे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनाला बळकटी मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top