अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी; तातडीच्या कारवाईचे आदेश

शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, नालेसफाई व अतिक्रमणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) सविस्तर पाहणी दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले.

सर्वप्रथम आयुक्तांनी सामरा नगर उद्यान, सामरानगर परिसराला भेट दिली. येथे स्थानिक नागरिक श्री. सचिन थोटे यांनी वारंवार मांडलेल्या सांडपाण्याच्या समस्येची त्यांनी सखोल पाहणी केली. परिसरात सांडपाणी साचत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तातडीने निचरा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश दिले.

यानंतर सामरानगर व गजराज नगर भागात म्हशीवाल्यांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्यांची त्यांनी पाहणी केली.

या अतिक्रमणामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर त्वरित कारवाई करून अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.

कोंडेश्वर रोडवरील पेट्रोल पंपासमोरील कच्च्या नालीची दयनीय अवस्था पाहून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. येथे नाली पक्की करून सांडपाण्याचा सुरळीत निचरा होईल यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच मनपा उर्दू शाळा क्रमांक ११ समोरील नाल्यांची पाहणी करत त्यांनी स्वच्छतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून येथे नियमित साफसफाई व दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आठवडी बाजार परिसरातील मटन मार्केट येथेही आयुक्तांनी भेट दिली. येथे अतिक्रमणामुळे नाल्यांचा प्रवाह अडथळलेला असून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. या ठिकाणी अतिक्रमण हटवून नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top