जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार

मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनसेवा सुरू झाली आहे.

अशा स्थितीत जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व महापौरांवर अधिक जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेता, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून शासनाशी समन्वय साधण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली.

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक मुंबईत अंधेरी (पश्चिम) येथे महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक २६ एप्रिल २०२६) संपन्न झाली. त्यावेळी संबोधित करताना त्या बोलत होत्या.

या परिषदेचे आयोजन अंधेरी (पश्चिम) येथे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिकराज भवन या वास्तूमधील सभागृहात करण्यात आले.

या बैठकीला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे, ठाण्याच्या महापौर श्रीमती शर्मिला पिंपळोलकर, मीरा-भाईंदरच्या महापौर श्रीमती डिंपल मेहता, वसई-विरारचे महापौर श्री. अजीव पाटील, नवी मुंबईच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर श्रीमती हर्षाली चौधरी – थवील, भिवंडी-निजामपूरचे महापौर श्री. नारायण चौधरी, धुळे शहराच्या महापौर श्रीमती मायादेवी परदेशी, अमरावतीचे महापौर श्री. श्रीचंद तेजवानी, इचलकरंजीचे महापौर श्री. उदय धातुंडे, कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रुपाराणी निकम, जालना शहराच्या महापौर श्रीमती वंदना मगरे, परभणीचे महापौर श्री. सय्यद इकबाल, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती कविता मुळे आदी महापौर उपस्थित होते.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. रणजित चव्हाण, संयोजक लक्ष्मणराव लटके, कार्यालयीन सचिव श्रीमती निधी लोके हे देखील यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी, परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. रणजित चव्हाण यांनी उपस्थित सर्व महापौरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष मुंबईचे महापौर असतात. तर उपाध्यक्षांची निवड केली जाते. त्यानुसार पदसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पद निवड ही एक वर्ष कालावधीसाठी असते.

उपाध्यक्ष निवडीनंतर मार्गदर्शन करताना, अध्यक्षीय भाषणात श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतकी महोत्सवी वर्षात मला महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आणि सर्व महापौरांना सदस्य पदाचा मान मिळाला, हा एक प्रकारचा आपला गौरव आहे.

सुमारे चार वर्षांनंतर महाराष्ट्र महापौर परिषदेच्या रूपाने राज्यातील महापौरांना देखील आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. सर्व महापौरांचे प्रश्न, मागणी इत्यादी परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मांडणार आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक मुंबईत आयोजित करण्यात येईल. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी या परिषदेचा लाभ होईल, असे श्रीमती तावडे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. रणजित चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राज्यातील महापौरांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी २०१२ मध्ये महाराष्ट्र महापौर परिषदेची स्थापना झाली. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे सन १९२६ मध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली. मुंबईत संस्थेचे मुख्यालय आहे तर देशात ५० ठिकाणी शाखा आहेत. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या राज्यात २०१२ पासून २२ बैठका झाल्या आणि १०१ ठराव मंजूर झाले.

शासनाकडे पाठवलेले काही ठराव मंजूर झाले, तर शासनाकडे प्रलंबित ठराव मंजूर करण्याची जबाबदारी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून पार पाडण्यात येईल, असे ते म्हणाले.

संस्थेचे मानद संचालक तथा परिषदेचे संयोजक श्री. लक्ष्मणराव लटके यांनी महापौरांचे कोणते अधिकार आहेत, कोणते ठराव प्रलंबित आहेत, यासह विविध विषयांची सविस्तर माहिती दिली.

तर, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या कार्यालयीन सचिव श्रीमती निधी लोके यांनी सर्व महापौरांशी आपसात समन्वय साधण्यासाठी संवाद यंत्रणा स्थापन करण्यात येईल. यापुढे अध्यक्षांच्या परवानगीने सातत्याने बैठक आयोजित केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top