अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा स्थापना दिवसानिमित्त महानगरपालिकेचे मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला.
शुक्रवार दिनांक १ मे,२०२६ रोजी अमरावती मनपाच्या प्रांगणात सदर ध्वजारोहन कार्यक्रम सकाळी ठिक ७.१५ मिनिटांनी घेण्यात आला.
यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा स्थापना दिवसाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आपल्या भाषणात सांगीतले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे. १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली.
हा दिवस केवळ राज्यनिर्मितीचा नसून, आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव आहे. महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक महान व्यक्तींच्या विचारांनी आपल्या राज्याला समृद्ध आणि प्रगत बनवले आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या जनगणना अंतर्गत स्व-गणना (Self Enumeration) उपक्रमाचाही येथे विशेष उल्लेख करावासा वाटतो. ही प्रक्रिया प्रत्येक नागरिकाला स्वतःची माहिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदवण्याची संधी देते. त्यामुळे शासनाला योग्य नियोजन, सुविधा आणि विकासकामे प्रभावीपणे राबविणे शक्य होते.
सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, या स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपली माहिती प्रामाणिकपणे नोंदवावी आणि या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे.
याचबरोबर, आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आणि अधिकारी वर्ग यांचे विशेष अभिनंदन केले व आभार मानले.
त्यांच्या समन्वयातून आणि परिश्रमातूनच शहराचा सर्वांगीण विकास शक्य होत आहे.
आज आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शहराच्या आणि राज्याच्या विकासासाठी नवी शपथ घ्यावी. स्वच्छ, सुंदर आणि प्रगत शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून योगदान देणे आवश्यक आहे.
आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा यावेळी महापौर महोदयांनी व्यक्त केल्या.
यावेळी वंदेमातरम, महाराष्ट्र राज्यगीत (समूहगीत) सादरीकरण करण्यात आले. सदर महाराष्ट्र राज्यगीत सादरीकरण विजय खंडारे सर यांनी केले.
यावेळी महानगरपालिका मराठी माध्यमिक मुलांची शाळा वडरपुरा येथील विद्यार्थ्यांच्या बँन्ड पथकाने यावेळी राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खंडारे सर यांनी केले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या ध्वजारोहण कार्यक्रमात स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, झोन सभापती सौ.स्वाती कुलकर्णी, ईस्माईल कासम लालुवाले, नगरसेवक आशिष अतकरे, सचिन वैद्य, नगरसेविका सौ.सुरेखा लुंगारे, सौ.सुनिता भेले, सौ.विद्या माटे, सौ.सुनिता लोणारे, सौ.ललिता रतावा, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक तथा मुख्यलेखाधिकारी श्यामसुंदर देव, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, मंगेश कडू, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, अग्निशमन अधिक्षक अजय पंधरे, कार्यालय अधिक्षक गुलशन मिरानी, उपअभियंता, अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







