आगामी २०२७ च्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या गणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज प्रशिक्षणाचे तिसरे सत्र उत्साहात पार पडले.
२३ एप्रिल ते ०८ मे २०२६ या कालावधीत शहरातील पाचही झोनमध्ये एकाचवेळी सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत विविध तांत्रिक व प्रात्यक्षिक सत्रांद्वारे गणक व पर्यवेक्षकांना सक्षम केले जात आहे. घरगुती सर्वेक्षणाची पद्धत, अचूक माहिती संकलन, डिजिटल साधनांचा वापर तसेच नागरिकांशी प्रभावी संवाद याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.
आजच्या सत्रादरम्यान झोन क्र. २ अंतर्गत येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राला सभापती स्वाती कुलकर्णी यांनी भेट देऊन प्रशिक्षण प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांनी उपस्थित गणक व पर्यवेक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जनगणना ही अत्यंत जबाबदारीची आणि राष्ट्राच्या विकासाशी निगडित प्रक्रिया असल्याचे सांगत सर्वांनी प्रामाणिकपणे व अचूकतेने कार्य पार पाडावे, असे आवाहन केले.
यावेळी श्री योगेश पीठे, उपायुक्त (१) तथा शहर जनगणना अधिकारी आणि श्री ऋषिकेश पठारे, जिल्हा समन्वयक यांनी विविध प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल जनगणना प्रक्रियेमधील अचूकता, गोपनीयता आणि तांत्रिक बाबींचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रशिक्षणादरम्यान गटचर्चा, प्रश्नोत्तर सत्रे तसेच प्रत्यक्ष सराव यांचा समावेश करण्यात आल्याने सहभागी कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढत असून, प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यास मदत होत आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या या नियोजनबद्ध उपक्रमामुळे अमरावती शहरातील जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे





