११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त; व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंड

अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक प्लास्टिकविरोधात आज मोठी कारवाई करत तब्बल ११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले. “स्वच्छ शहर – प्लास्टिकमुक्त शहर” या उद्दिष्टाने महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवत संबंधित व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंडही वसूल केला.

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे (झोन क्र. ५) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

इतवारा बाजार पेट्रोल पंप परिसरातील अजय बजाज यांच्या दयाल ट्रेडर्स येथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विक्री सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती. त्यानंतर प्लास्टिक विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाने तात्काळ दुकानावर धडक कारवाई केली.

तपासणीदरम्यान संबंधित व्यापाऱ्याचे आणखी एक गोडाऊन एसबीआय बँक (श्याम चौक) मागे असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने त्या ठिकाणीही छापा टाकून कठोर कारवाई केली.

या मोहिमेत प्लास्टिक पन्नी, प्लास्टिक ग्लास, पन्नी कोटिंग असलेल्या पत्रावळ्या आदी प्रतिबंधात्मक साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत ₹१.७५ ते ₹२ लाख असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, दयाल ट्रेडर्स येथे दुसऱ्यांदा प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा आढळून आल्याने संबंधित व्यापाऱ्याकडून ₹१०,०००/- दंड धनादेशाद्वारे वसूल करण्यात आला.

या कारवाईत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, प्लास्टिक स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top