महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता-१, प्रकाश विभाग, प्रधानमंत्री आवास योजना विभाग, आरोग्‍य विभाग, स्‍वच्‍छता विभाग, उद्यान विभाग, पशु विभाग, विधी विभाग, अभिलेखागार विभाग, लेखा विभाग, अतिरिक्‍त आयुक्‍त कार्यालय, उपायुक्‍त कार्यालय, कॅश विभाग, जन्‍म-मृत्‍यु विभाग, संगणक विभाग, जनसंपर्क विभाग, सामान्‍य प्रशासन विभाग, नगरसचिव भांडार विभाग, निवडणूक विभाग, कर विभाग या विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विविध विभागांतील प्रशासकीय कार्यपद्धती, प्रलंबित कामे, फाईल व्यवस्थापन तसेच कार्यालयीन शिस्त यांची तपासणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी विभागनिहाय सुरू असलेल्या कामांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कार्यालयीन कामकाज वेळेत पूर्ण व्हावे, फाईलची अनावश्यक प्रलंबितता राहू नये तसेच विभागांमध्ये समन्वय राखून कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी कार्यालयीन स्वच्छता, उपस्थिती नोंदवही, दस्तऐवजांची जपणूक, संगणकीय कामकाज आणि प्रशासकीय नोंदी यांची तपासणी करण्यात आली. काही विभागांमध्ये सुधारणा करण्याबाबतही आयुक्तांनी सूचना दिल्या. कार्यालय परिसर स्वच्छ, शिस्तबद्ध आणि व्यवस्थित ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

तसेच विविध विभाग प्रमुखांकडून प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील सुरू असलेली विकासकामे, प्रशासकीय प्रक्रिया आणि आगामी प्रकल्पांच्या तयारीबाबत माहिती घेत कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

महानगरपालिकेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, शिस्त आणि कार्यक्षमता आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांनी यावेळी सांगितले. सर्व विभागांनी समन्वय राखून प्रभावीपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top