पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” साठी शहरी संवाद कार्यक्रम संपन्न

“विकसित महाराष्ट्र 2047” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय शहरी संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या एकदिवसीय कार्यक्रमात राज्यभरातील महापौर, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रकल्प प्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी “विकसित महाराष्ट्र 2047” साध्य करण्यासाठी पारदर्शक, सक्षम आणि नागरिकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था उभारण्याची गरज अधोरेखित केली. उद्घाटनप्रसंगी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचा सत्कार करण्यात आला.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करताना सांगीतले की, “विकसित महाराष्ट्र 2047” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी आज आयोजित करण्यात आलेला हा शहरी संवाद कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक ठरला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या पाया आहेत, आणि त्या अधिक सक्षम, पारदर्शक व नागरिकाभिमुख झाल्या तरच आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासन अधिक परिणामकारक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, हरित उपक्रम आणि पायाभूत सुविधांचा विकास या क्षेत्रांमध्ये आम्ही ठोस पावले उचलत आहोत. या कार्यक्रमातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आमच्या शहराच्या विकासाला अधिक गती देऊ. विशेषतः नागरिकांचा सहभाग वाढवणे, पारदर्शकता राखणे आणि आर्थिक शिस्त मजबूत करणे या बाबींवर अधिक भर देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

“विकसित महाराष्ट्र 2047” हे केवळ एक स्वप्न नसून ते साकार करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच आपण हे उद्दिष्ट निश्चितच गाठू शकतो, असा विश्वास यावेळी महापौरांनी व्‍यक्‍त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top