अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांची आज शनिवार, दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यामध्ये फरशी स्टॉप, दस्तूर नगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळील नाला, कवर नगर परिसरातील नाले व रस्ते, व्ही.आय.पी. अपार्टमेंट शेजारील नाला, शंकर नगरचा नाला तसेच केडिया नगर उद्यान परिसराचा समावेश होता.
पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त यांनी सर्व नाल्यांची नियमित व सखोल स्वच्छता करून त्यातील गाळ तात्काळ उचलण्याचे निर्देश दिले. नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर सातत्याने कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्ते व सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
राहिवासी भागांमधील अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच धोकादायक व वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून रस्ते व पादचारी मार्ग मोकळे ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
केडिया नगर उद्यानाची पाहणी करताना उद्यान परिसर स्वच्छ, सुस्थितीत व नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आला. नियमित देखभाल, पाणीपुरवठा व हरित क्षेत्र संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही दिले.
दरम्यान, नाल्यामध्ये कचरा टाकताना एक नागरिक आढळून आल्याने अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक मॅडम यांच्या निर्देशानुसार संबंधित नागरिकावर स्पॉट फाईन रु. ५००/- आकारण्यात आला.


