अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट

मदर्स डेच्या निमित्ताने सामाजिक संवेदनशीलतेचा हृदयस्पर्शी अनुभव रविवारी आधार शहरी बेघर निवारा केंद्रात पाहायला मिळाला. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सहपरिवार केंद्राला सदिच्छा भेट देत निवारावासी बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधला.

आयुक्त वर्षा लड्डा यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता, शिस्त तसेच निवारावासींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आधार केंद्राच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत समाजातील बेघर, निराधार व गरजू नागरिकांसाठी संस्था करत असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजातील निराधार, बेघर आणि गरजू नागरिकांसाठी केले जाणारे हे कार्य केवळ प्रशासनिक जबाबदारी नसून एक मोठे सामाजिक दायित्व आहे. माणुसकी जपणारे आणि गरजूंच्या आयुष्यात आधार निर्माण करणारे हे अतिशय सुंदर व संवेदनशील काम आहे.”

भेटीदरम्यान आयुक्तांनी निवारावासी बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, गरजा आणि दैनंदिन जीवनाविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्या आपुलकीच्या संवादामुळे केंद्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक निवारावासींनी आपल्या भावना व्यक्त करत आयुक्तांचे आभार मानले. मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना शुभेच्छा देताना आयुक्त वर्षा लड्डा म्हणाल्या की, “समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आधार आणि मायेची गरज असते.”

त्यांनी निवारावासींच्या पाठीवर मायेची थाप देत त्यांना आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा संदेश दिला. यावेळी त्यांनी अमरावतीकरांनाही सामाजिक बांधिलकी जपत आधार शहरी बेघर निवारा केंद्राला शक्य त्या स्वरूपात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

“समाजातील गरजू, निराधार आणि बेघर बांधवांना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी या सेवाभावी कार्यात सहभागी होऊन केंद्राला पाठबळ द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
आधार शहरी बेघर निवारा केंद्राच्या वतीने आयुक्तांचे स्वागत करण्यात आले.

त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे केंद्राच्या कार्याला नवे बळ आणि प्रेरणा मिळाल्याची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. प्रशासन आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करत असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top