नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात नवसारी प्रभागातील विलास कॉलनी येथे राहणारी व होली क्रॉस इंग्रजी कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी सई रीता सतीश मोकलकर हिने ९९.६० टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या यशानिमित्त अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते सईचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सईला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला.
सई ही भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा तसेच माजी नगरसेविका रिता मोकलकर यांची कन्या आहे. सईला दहावीच्या अभ्यासासाठी तिचे वडील व एस. बी. कोचिंग क्लासेसचे संचालक सतिश मोकलकर तसेच काका भरत मोकलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सईचा भाऊ देखील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून कुटुंबामध्ये शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जाते. सईला भविष्यात आयआयटी इंजिनिअर बनून देशसेवा करण्याची इच्छा आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सईने गायन क्षेत्रातही उल्लेखनीय प्राविण्य मिळवले असून तिने संगीताच्या चार परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. तिला पुस्तके वाचनाची विशेष आवड आहे.
यावेळी नगरसेवक संजय तिरथकर, मंगेश खोंडे तसेच माजी नगरसेविका रिता मोकलकर उपस्थित होते.
