महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त; आयुक्त वर्षा लड्डा यांचे कडक निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागपुरी गेट परिसर, ट्रान्सपोर्ट मार्केट परिसर, अग्निशमन केंद्र तसेच हबीब नगर येथील महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसची पाहणी करून अतिक्रमणाबाबत संबंधित विभागांना कडक निर्देश दिले.

पाहणीदरम्यान हबीब नगर येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेसवर बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडच्या आत ११ जनावरे व ६ बोकड बांधून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित जनावरे तात्काळ जप्त करून महानगरपालिकेच्या गौरक्षण केंद्रावर जमा करण्यात आली.

तसेच सदर जागेवरील अतिक्रमण त्वरित हटविण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, महानगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे स्वतःहून त्वरित हटवावीत, अन्यथा महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करून पुढील कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

पाहणीदरम्यान अग्निशमन केंद्रावरील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही तपासण्यात आली. कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेली कामे वेळेत व पूर्ण जबाबदारीने पार पाडणे अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वच्छता विभागालाही त्यांनी कडक शब्दांत सूचना देत साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा करू नये, प्रत्येक परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा, असे निर्देश दिले. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देत सर्व स्वास्थ्य निरीक्षकांनी जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

“सध्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते समाधानकारक नाही. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व प्रभावीपणे पार पाडावी,” अशा शब्दांत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव, सहायक आयुक्त मनोज शहाळे, बाजार परवाना सहाय्यक आयुक्त मंगेश कडू, उपअभियंता विवेक देशमुख, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड तसेच स्वास्थ्य निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top