महानगरपालिका वडाळी शाळेचा भारत टॅलेंट सर्च परीक्षेत १००% निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अमरावती महानगरपालिका शाळा क्रमांक १४, वडाळी येथील विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्येही महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी सरस ठरत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून भौतिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ होत असून, त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशातून दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी सहभागी होत असलेल्या व तुलनेने कठीण मानल्या जाणाऱ्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शाळा क्रमांक १४, वडाळी येथील सहभागी सर्व आठही विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

यामध्ये इयत्ता पहिलीतील ऋषी अनिल मेश्राम व तनिष गोपाळ डोंगरे (जिल्ह्यातून पाचवा क्रमांक), इयत्ता दुसरीतील स्वरा सचिन तुप्पट व रुद्र आशिष ब्राह्मणकर, तसेच इयत्ता तिसरीतील रोहिणी अतुल बावणे, स्वरांजली सतीश राऊत, गुणश्री गुणवंत बोरकर आणि ईश्वरी अविनाश माहुलकर यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो सहलीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकत्याच आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक योगेश पखाले, केंद्र समन्वयक अनुप भारंबे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा मेहरे, शिक्षिका सुलोचना डाखोळे, करिष्मा गोफने व प्राजक्ता चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका स्मिता वानखडे, ज्योत्सना गवई, मोनिका पंधरे आणि वैशाली देशमुख यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top