अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी प्रभाग क्र. ७ जवाहर स्टेडियम परिसरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा व्यवस्थापन तसेच पावसाळ्यापूर्वी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस स्वास्थ निरीक्षक, सफाई कर्मचारी, बिटप्यून, कोणार्क कंपनीचे कंत्राटदार तसेच स्वच्छता विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रभागातील सुरू असलेल्या स्वच्छता कामांचा आढावा घेत महापौरांनी स्वच्छता व्यवस्थेबाबत अधिक काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी स्वास्थ निरीक्षकांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा तसेच नाल्यांची नियमित साफसफाई करण्यावर विशेष भर देण्यात आला. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा व अडथळे तात्काळ हटवून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
अनेक ठिकाणी नाल्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिग आढळून येत असल्याने ते तातडीने उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. स्वच्छता कामात कोणताही हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
प्रभागातील बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे तसेच व्यावसायिक भागांमध्ये वाढणाऱ्या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी दुकानदार, हॉकर्स आणि हातगाडी व्यावसायिकांना स्वच्छतेबाबत जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. प्रत्येक दुकानदार, हॉकर्स व हातगाडीवाल्यांनी स्वतःकडे डस्टबिन ठेवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारपेठेत निर्माण होणारा कचरा रस्त्यावर किंवा नाल्यात टाकण्याऐवजी तो डस्टबिनमध्ये जमा करून घंटागाडीतच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ महानगरपालिका प्रशासन नव्हे, तर नागरिकांचीही जबाबदारी महत्त्वाची असल्याचे महापौरांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, हॉकर्स, हातगाडीवाले तसेच नागरिकांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच संबंधित स्वास्थ निरीक्षकांनी आपल्या प्रभागात नियमित पाहणी करून स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
प्रभागात घंटागाडी वेळेवर पोहोचते का, कचरा संकलन नियमित होते का, याची तपासणी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देऊन स्वच्छता सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.



