“डेंगूला हरविण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात” — महापौर श्रीचंद तेजवानी यांचे आवाहन

जागतिक डेंगू दिनानिमित्त आज दि. 16 मे 2026 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मनपा येथे उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीरोग तसेच विविध कीटकजन्य रोगांविषयी जनजागृती करून नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात डॉक्टर्स, नर्सेस, एम.पी.डब्ल्यू., आशा वर्कर, आरोग्य सेवक तसेच आरोग्य विभागातील विविध स्तरांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी, मनपा आयुक्त वर्षा लड्डा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, विरोधी पक्षनेते विलास इंगोले,अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, सहाय्यक संचालक अकोला मंडळ हिवताप डॉ. रफिक अन्सारी, साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. रुपेश खडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटबागे व डॉ. स्वाती कोवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी नागरिकांना घर परिसर स्वच्छ ठेवण्याचे, पाण्याची साठवण टाळण्याचे व डेंगूपासून बचावासाठी प्राथमिक प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे जाहीर आवाहन केले. “डेंगू मुक्त अमरावतीसाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी सांगितले.
स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी शहर स्वच्छतेवर भर देत, “स्वच्छतेसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यास मी सदैव तयार आहे,” असे आश्वासन दिले.
विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “दोन वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये डेंगू व इतर साथीच्या रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. मात्र यावर्षी परिस्थिती नियंत्रणात असून संशयित रुग्णांची संख्या केवळ 86 पर्यंत मर्यादित राहिली आहे. हे आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण कार्याचे फलित आहे.”
मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी आरोग्य विभागाला औषधे व आवश्यक साहित्याची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत “डेंगूमुक्त अमरावती करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही दिली.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांमध्ये जाऊन नियमित सर्वेक्षण करून आरोग्यविषयक माहिती संकलित करण्याचे तसेच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
सहाय्यक संचालक डॉ. रफिक अन्सारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, डॉ. जुनेद खान व डॉ. मालखेडे यांनी देखील डेंगू प्रतिबंध मोहिमेसाठी सदैव सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. रुपेश खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आरोग्य विभागाला जन्मापासून ते मरणापर्यंत जनसेवेची संधी मिळते. त्यामुळे जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार आम्ही केला आहे.” त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुन्हा एकदा सेवा शपथही दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक हैदर अली व शशिकांत जयस्वाल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन दीपांकर बरडे व बबन खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रुपेश खडसे यांनी केले.

या कार्यक्रमाला वर्षा गुहे, कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. आकिब खान, डॉ. इम्रान खान, तेजस्विनी नागपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा वर्कर्स, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top