“एक हात मदतीचा” या अभिनव उपक्रमांतर्गत प्रभात टॉकीज परिसरातून एका निराधार वृद्ध नागरिकाला सुरक्षितपणे आधार केंद्रात दाखल करून मानवतेचे दर्शन घडविण्यात आले.
आज दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास, शहरातील तापमान तब्बल 46° सेल्सिअस असताना प्रभात टॉकीजजवळ एक वृद्ध व्यक्ती गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकाने आधार केंद्राला दूरध्वनीद्वारे दिली. संबंधित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याचे कळविण्यात आले.
माहिती मिळताच आधार केंद्राची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली व संबंधित वृद्ध व्यक्तीस सुरक्षितपणे केंद्रात आणण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्या व्यक्तीची अत्यंत दयनीय अवस्था निदर्शनास आली. दीर्घकाळ स्वच्छतेअभावी त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात मळ साचलेला होता.
आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापक ज्योती राठोड तसेच काळजीवाहक रोहित घोंगडे यांनी तत्परतेने त्या वृद्धाची स्वच्छता करून आंघोळ घातली, स्वच्छ कपडे उपलब्ध करून दिले व आवश्यक काळजी घेतली.
सध्या संबंधित वृद्ध व्यक्तीची प्रकृती स्थिर असून ते स्वच्छ, सुरक्षित व आनंदी वातावरणात राहत आहेत.
अमरावती महानगरपालिकेच्या “एक हात मदतीचा” उपक्रमांतर्गत निराधार, गरजू व असहाय नागरिकांना मदतीचा हात देण्याचे कार्य सातत्याने सुरू असून या घटनेतून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी व माणुसकीचे जिवंत उदाहरण समोर आले आहे.

