बकरी ईदनिमित्त अमरावती महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण तसेच गौवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात अमरावती महानगरपालिकेत गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

ही बैठक महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, पशुसंवर्धन उपायुक्‍त संजय कावरे, सहाय्यक आयुक्‍त डॉ.पुरुषोत्‍तम सोळंके, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, राजापेठ वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण वांगे, खोलापुरी गेट चे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, नागपुरी गेट चे पोलीस निरीक्षक हनुमंत उरलागोंडावार, गाडगेनगर चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सिटी कोतवाली चे पोलीस निरीक्षक श्री. कोटनाके, राजापेठ चे पोलीस निरीक्षक उमेश मुंढे, बडनेरा चे पोलीस निरीक्षक सुनिल चव्‍हाण, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंद्रे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, विविध विभागांचे अधिकारी, स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, संबंधित पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच मुस्‍लीम बांधव उपस्थित होते.

बैठकीदरम्यान बकरी ईद सणाच्या कालावधीत शहरात कोणतीही गैरसोय होऊ नये, नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात तसेच स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी दिनांक २७ मे २०२६ ते २९ मे २०२६ या कालावधीत विविध संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची विशेष नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित ठिकाणी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, कचरा संकलनासाठी कंटेनर आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

शहरातील स्वच्छता व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांची नावे व त्यांचे मोबाईल क्रमांक संबंधित पोलीस स्टेशनना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन व पोलीस विभागामध्ये तातडीने समन्वय साधता येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

बकरी ईद निमित्त कुरबानीसाठी जनावरांची वाहतूक करताना वाहनांमधून रक्त, मांस अथवा जनावरांचे अवशेष रस्त्यावर पडून अस्वच्छता निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या.

अशा प्रकारामुळे शहरातील स्वच्छतेवर परिणाम होऊ नये तसेच नागरिकांच्या आरोग्यास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

बैठकीत गौवंश संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरही विशेष चर्चा करण्यात आली. कायद्यांतर्गत गाय, वासरू व बैल यांची कत्तल होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

कोणत्याही प्रकारचा संशयास्पद प्रकार अथवा कायद्याचे उल्लंघन निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन बडनेरा, नागपुरी गेट व खोलापुरी गेट यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे (मो. ७०३०९२२९०२), पशुधन निरीक्षक निलेश सोळंके (मो. ७०३०९४०२२७) आणि पशुधन निरीक्षक गुणसागर गवई (मो. ७०३०९२२२९५८) यांच्याशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न लक्षात घेता, अशा जनावरांना पकडण्यासाठी महानगरपालिकेच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार असून या पथकाला संबंधित पोलीस स्टेशनमार्फत पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यामुळे कारवाई अधिक प्रभावीपणे राबविता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top