अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मा. श्री. अरुण डोंगरे यांची अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.
यावेळी राज्य सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
भेटीदरम्यान नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा निर्धारित कालावधीत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी व्यक्त केले.
प्रशासनातील उत्तरदायित्व वाढवून लोकाभिमुख व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सेवा वितरण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांच्या अडचणी कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांमध्ये राज्य सेवा हक्क कायद्याचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण, ऑनलाइन सेवांचा विस्तार आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करणे तसेच नागरिकाभिमुख सेवा अधिक गतिमान करण्यासाठी विविध विभागांमधील समन्वय मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
