कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कर विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत महसूल वाढ आणि थकबाकी वसुलीसाठी कठोर व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे झालेल्या बैठकीत कर वसुलीची सद्यस्थिती, थकबाकी वसुली, महसूल वाढ तसेच झोननिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत मालमत्ता कर वसुलीची सविस्तर आकडेवारी सादर करण्यात आली.

उद्दिष्टांच्या तुलनेत कमी वसुली असलेल्या वार्डांची स्वतंत्र समीक्षा करत आयुक्त वर्षा लड्डा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने वसुली वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक झोनने निश्चित उद्दिष्टांसह कार्य करून नियमित प्रगती अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेच्या आर्थिक बळकटीसाठी कर वसुली हा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे नमूद करत आयुक्तांनी मोठ्या थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करून विशेष वसुली मोहीम राबविण्याचे आदेश दिले. नियमानुसार जप्ती, सीलिंग आणि अन्य कायदेशीर कारवाई करून थकबाकी वसुलीची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने ऑनलाइन कर भरणा प्रणालीचा अधिक प्रचार, व्यापक जनजागृती मोहीम तसेच कर भरणा प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

बैठकीदरम्यान महसूल वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांचीही समीक्षा करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून करदात्यांना दर्जेदार व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

तसेच सहाय्यक संचालक, नगररचना विभाग यांनी मालमत्ता कर विभागाशी आवश्यक समन्वय ठेवून मालमत्ता कर वसुली मोहिमेस पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश आयुक्त वर्षा लड्डा यांनी दिले.

यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल वाढीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी जबाबदारीने व समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. शहरातील विकासकामांसाठी आवश्यक आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी कर वसुलीत कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top