जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कामाला गती देत झोननिहाय आढावा बैठक आयोजित केली.

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी आणि जनगणना कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत जनगणना संचालनालयाने नुकत्याच घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी सांगितले की, जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्यामध्ये नोंदविण्यात येणारी प्रत्येक माहिती अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे.

त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या प्रगणकांनी भरलेल्या माहितीची काटेकोर तपासणी करणे आणि आवश्यक तेथे तात्काळ सुधारणा करणे ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

त्या अनुषंगाने चार्ज अधिकारी स्तरावर माहितीची पडताळणी स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
बैठकीत प्रगणक, पर्यवेक्षक आणि चार्ज अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. क्षेत्रीय कार्यामध्ये प्रगणकांकडून संकलित करण्यात येणारी माहिती योग्य प्रकारे भरली जात आहे किंवा नाही, याची दैनंदिन तपासणी पर्यवेक्षकांनी करावी.

तसेच चार्ज अधिकाऱ्यांनी देखील नियमितपणे माहितीचे परीक्षण करून कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रणालीवर अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले.

आयुक्तांनी सर्व चार्ज अधिकारी आणि पर्यवेक्षकांना त्यांच्या अधिनस्त प्रगणकांचे काम नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक गटाचे क्षेत्रीय काम ५ जून २०२६ पर्यंत पूर्ण होईल, यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय आणि पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आला.

याशिवाय, प्रगणकांनी क्षेत्रातून गोळा केलेली माहिती वेळेवर ‘सिंक’ करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. माहिती संकलनानंतर ती तात्काळ प्रणालीमध्ये अद्ययावत न झाल्यास डेटामध्ये विसंगती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्व पर्यवेक्षकांनी आपल्या अधिनस्त प्रगणकांना नियमितपणे डेटा सिंक करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत माहितीतील त्रुटी आणि दुरुस्ती प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य क्षेत्रीय काम ५ जूनपूर्वी पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले.

आयुक्त वर्षा लड्डा यांनी पर्यवेक्षकांच्या भूमिकेवर विशेष भर देत सांगितले की, प्रत्येक पर्यवेक्षकाने दररोज सायंकाळी आपल्या अधिनस्त प्रगणकांची बैठक घेणे अनिवार्य राहील.

या बैठकीमध्ये दिवसभरातील कामाचा आढावा घेणे, आलेल्या अडचणी समजून घेणे, माहितीची गुणवत्ता तपासणे आणि डेटा सिंक झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे. नियमित आढावा बैठकीमुळे जनगणना कार्य अधिक प्रभावीपणे आणि अचूकतेने पूर्ण होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

चार्ज अधिकाऱ्यांनाही त्यांच्या झोनमधील संपूर्ण डेटा तपासण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक असल्यास प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन भरलेल्या माहितीची खातरजमा करावी, तसेच नागरिकांकडून मिळालेली माहिती आणि प्रणालीमध्ये नोंदविलेली माहिती यामध्ये सुसंगती असल्याची खात्री करावी, असेही सांगण्यात आले.

बैठकीच्या शेवटी आयुक्तांनी सर्व अधिकारी, पर्यवेक्षक आणि प्रगणकांना जनगणना कार्य ही अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया असल्याचे स्मरण करून दिले.

अचूक माहिती, नियमित डेटा सिंक, सातत्यपूर्ण पडताळणी आणि वेळेवर काम पूर्ण करणे या चार बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व झोनचे काम ५ जून २०२६ पर्यंत पूर्ण होईल यासाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top