अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत गुरुवारी मध्य झोन क्र. २, राजापेठ विभागात मोठी कारवाई करण्यात आली.
मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या दोन थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. महानगरपालिकेने यापुढेही अशीच कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
महानगरपालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, वार्ड क्रमांक बी-६ अंतर्गत मालमत्ता क्रमांक ८०७ व ८०७-१ चे मालमत्ताधारक यांच्याकडे मालमत्ता कराची तब्बल ६ लाख १६ हजार १५ रुपये इतकी थकबाकी होती.
संबंधित मालमत्ताधारकांना वेळोवेळी कर भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत कराचा भरणा न झाल्यामुळे अखेर महानगरपालिकेने संबंधित मालमत्ता सील करण्याची कारवाई केली.
याचप्रमाणे वार्ड क्रमांक बी-६ मधील मालमत्ता क्रमांक ३१-१० चे मालमत्ताधारक यांच्याकडे मालमत्ता कराची ३० लाख २९ हजार १२८ रुपये इतकी मोठी थकबाकी होती.
संबंधित मालमत्ताधारकांनाही अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच थकबाकीचा भरणा करण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. मात्र, कोणतीही दखल न घेतल्याने आणि आजपर्यंत कर न भरल्यामुळे या मालमत्तेवरही सीलिंगची कारवाई करण्यात आली.
या दोन्ही मालमत्तांवरील थकबाकीची एकूण रक्कम ३६ लाख ४५ हजार १४३ रुपये इतकी असून, महानगरपालिकेच्या वसुली मोहिमेतील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.
शहरातील अनेक मोठे थकबाकीदार अद्यापही कराचा भरणा टाळत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, त्यांच्यावरही आगामी काळात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले
