आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सकाळी वडाळी येथील शहरी आरोग्य केंद्र, महानगरपालिका शाळा तसेच टी.बी. हॉस्पिटल मागील शहरी आरोग्य केंद्र व शाळेची पाहणी करून आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी आरोग्य केंद्रांमधील रुग्णसेवा, औषध साठा, मातृ व बाल आरोग्य सेवा, लसीकरण कार्यक्रम, स्वच्छता व्यवस्था, कर्मचारी उपस्थिती आणि विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. रुग्णांना वेळेवर व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच केंद्रांमध्ये स्वच्छता व देखभालीवर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वडाळी येथील महानगरपालिका शाळेच्या पाहणीवेळी सुरू असलेल्या नवीन इमारत बांधकामाचा आढावा घेत उच्च दर्जाचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज शैक्षणिक संकुल उभारण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना शिक्षक व शिक्षण विभागाला करण्यात आल्या.

टी.बी. हॉस्पिटल मागील शहरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कक्षाची मागणी केल्यानंतर संबंधित बांधकाम विभागाला आवश्यक रूमची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच आरोग्य केंद्र परिसरात शौचालय बांधकाम करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी आरोग्य आणि शिक्षण हे नागरी विकासाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.

सर्व आरोग्य केंद्रे व शाळांमध्ये सेवा गुणवत्ता, स्वच्छता आणि आवश्यक सुविधा कायम राखण्यासाठी नियमित पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top