२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्‍ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेला अधिक गती देण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून आज मध्य झोन क्र. २ अंतर्गत राजापेठ परिसरात मोठी वसुली कारवाई करण्यात आली.

मालमत्ता कराची तब्बल २२ लाख २१ हजार १२६ रुपये इतकी थकबाकी असलेल्या मालमत्तेला महानगरपालिकेच्या पथकाने सील केले.

महानगरपालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य झोन क्र. २ अंतर्गत वार्ड क्रमांक B-5 मधील मालमत्ता क्रमांक १३९०/१३९०/१ या मालमत्तेवर दीर्घकाळापासून मालमत्ता कराची मोठी थकबाकी प्रलंबित होती.

संबंधित मालमत्ताधारकांना वेळोवेळी कर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच थकबाकी भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक संधी देऊनही कराचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे अखेर महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित मालमत्तेवर सीलची कारवाई केली.

शहरातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरी सेवांसाठी मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मालमत्तांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे.

मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना राबविल्या असून, कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर जप्ती, सीलिंग आणि इतर कायदेशीर कारवाया करण्यात येत आहेत.

आजची कारवाई मध्य झोनचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाने सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मालमत्तेला सील लावले. या कारवाईदरम्यान सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण, निरीक्षक फैयाज खान तसेच वसुली लिपिक सुरज चावरे, स्वप्नील रामसे, धरम बिवाड आणि विशाल ढिक्याव यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top