आज शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी अमरावती महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या.
प्राप्त तक्रारींची दखल घेत महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना राबवून बहुतांश ठिकाणांवरील समस्या निकाली काढल्या.
महानगरपालिकेच्या विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रभावी कार्यवाही केली. स्वच्छता विभाग, अग्निशमन विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून पाणी उपसा व निचरा करण्याचे काम हाती घेतले.
चौधरी चौक परिसरात पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या. यावेळी पंजाबराव तायवाडे उपस्थित होते.
तसेच गांधी चौक येथील दत्त पॅलेस व अग्रवाल प्लाझा परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणी आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामासोबत आवश्यक त्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले.
याबाबत संबंधित यंत्रणेला तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या ठिकाणी सभापती स्वाती कुलकर्णी नगरसेवक मिलिंद बांबल नगरसेविका लविना हर्षे चंद्रशेखर कुलकर्णी विशाल कुलकर्णी उपस्थित होते.
यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसराचीही पाहणी करण्यात आली. रिटर्न पाण्यामुळे रुग्णालय परिसरात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने आपत्कालीन पंपाच्या साहाय्याने तात्काळ पाणी उपसून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अमरावती महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीत सतत सज्ज असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त नरेंद्र वानखडे उपायुक्त योगेश पिठे शहरा अभियंता रवींद्र पवार वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर अजय जाधव सहायक आयुक्त भूषण पुसदकर उपअभियंता दिनेश हंबर्डे अभियंता लक्ष्मण पावडे अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


