भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिन (National Immunization Day – NID) अंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.
शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रे, पोलिओ लसीकरण बूथ, बसस्थानके, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विशेष भ्रमणशील पथकांच्या माध्यमातून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार सौ. सुलभाताई खोडके, माजी पालकमंत्री ॲड. यशोमतीताई ठाकुर, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, सन्मा. नगरसेवक व नगरसेविका, उपायुक्त योगेश पीठे यांनी विविध पोलिओ लसीकरण केंद्रांना भेटी देऊन मोहिमेची पाहणी केली.
त्यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांशी संवाद साधत प्रत्येक बालकाला पोलिओची लस देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळपासूनच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय ज्या बालकांपर्यंत बूथवर येणे शक्य झाले नाही, अशा बालकांसाठी विशेष पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन लसीकरण करण्यात आले.
स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम मजूर, वीटभट्ट्या, झोपडपट्ट्या, भटक्या-विमुक्त समाजाची वस्ती तसेच बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातील बालकांना लसीकरणाचा लाभ मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताला सन २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले असले, तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओ विषाणूचे अस्तित्व कायम आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास आणि स्थलांतरामुळे हा विषाणू पुन्हा देशात येण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होते आणि पोलिओचा प्रसार रोखता येतो.
महानगरपालिका प्रशासनाने या मोहिमेसाठी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले.
शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मोहिमेचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने देखरेख करण्यात आली.
महापौर श्रीचंद तेजवानी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “पोलिओसारख्या गंभीर आजारापासून आपल्या बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पालकाने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ही आपल्या भावी पिढीचे आरोग्य सुरक्षित ठेवणारी महत्त्वाची लोककल्याणकारी मोहीम आहे.
भारताने पोलिओमुक्त देश म्हणून मिळविलेला मान कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपले सामाजिक उत्तरदायित्व ओळखून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.
पोलिओचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. आरोग्य विभाग व महानगरपालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.
प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील पोलिओ बूथला भेट देऊन किंवा आरोग्य पथकांच्या माध्यमातून आपल्या पाल्याला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब नक्की पाजावेत, असे आवाहन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केले.
महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनीही सर्व पालकांना आपल्या परिसरातील पोलिओ बूथवर जाऊन किंवा आरोग्य पथकांच्या माध्यमातून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले.
नागरिकांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी होणार असून, भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


