फायर ऑडिटबाबत अमरावती महानगरपालिकेची कोचिंग क्लासेस संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज दि. २९ जून २०२६ महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे शहरातील विविध कोचिंग क्लासेसच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

बैठकीत अग्निसुरक्षा नियमांचे पालन, फायर ऑडिटची आवश्यकता, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिक्षण संस्थांमध्ये दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे.

कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कोचिंग क्लासने शासन व अग्निशमन विभागाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट ही केवळ औपचारिकता नसून ती विद्यार्थ्यांच्या जीविताच्या संरक्षणाशी निगडित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सर्व कोचिंग क्लासेसनी आपल्या इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग (Emergency Exit) स्पष्टपणे दर्शविणे, विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करणे, आग लागल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध ठेवणे तसेच कर्मचारी व विद्यार्थ्यांना वेळोवेळी अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फायर ऑडिट करताना तपासण्यात येणाऱ्या निकषांची माहिती देत इमारतींची रचना, विद्युत सुरक्षा, अग्निशामक यंत्रांची उपलब्धता व कार्यस्थिती, पाण्याची व्यवस्था, आपत्कालीन जिने, सूचना फलक आणि बचाव व्यवस्थेची माहिती उपस्थितांना दिली. फायर ऑडिटमध्ये आढळणाऱ्या त्रुटी निश्चित कालावधीत दूर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत अनेक कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी फायर ऑडिट प्रक्रियेसंदर्भातील विविध शंका उपस्थित केल्या. त्यावर महानगरपालिका व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि सुरक्षा मानकांबाबतही माहिती देण्यात आली.

आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व संस्थांनी विहित मुदतीत फायर ऑडिट पूर्ण करून त्याचा अहवाल महानगरपालिकेकडे सादर करावा, असे निर्देश दिले. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, नियमबद्ध आणि जबाबदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून, यासाठी सर्व संबंधित संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी कोचिंग क्लासेस, हॉस्‍पीटल इत्‍यादी साठी एकसमान आणि प्रभावी “प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure – SOP)” तयार करण्याचे निर्देश दिले.

बैठकीस अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी सागर वानखडे, मुख्‍य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, मंगेश कडु, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, बाजार परवाना विभागाचे उदय चव्‍हाण तसेच अमरावती शहरातील विविध कोचिंग क्लासेसचे संचालक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top