आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला चालना देणे आणि शिक्षकांना नव्या शैक्षणिक बदलांसाठी प्रेरित करणे या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने एकदिवसीय भव्य कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिक्षण सभापती अॅड. प्रीतीताई हर्षल रेवणे यांच्या कल्पकता, दूरदृष्टी आणि पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महानगरपालिका संचालित ६३ शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राजकमल चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षासाठी उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
शिबिराचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, उपआयुक्त नरेंद्र वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत महानगरपालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता समाजपरिवर्तनाचे माध्यम म्हणून कार्य करावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी शिक्षण सभापती अॅड. प्रीतीताई हर्षल रेवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महानगरपालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्कदार आहे. शिक्षक हे या परिवर्तनाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि आधुनिक शिक्षणातील बदलांची माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शिक्षकाने स्वतःमध्येही सातत्याने बदल स्वीकारणे आवश्यक आहे.”
यानंतर प्रमुख मार्गदर्शक हेरंब कुलकर्णी यांनी “माझी शाळा बदलताना” या विषयावर अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही शाळेचा दर्जा हा केवळ इमारतीवर अवलंबून नसून शिक्षकांच्या विचारांवर, कार्यपद्धतीवर आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीवर अवलंबून असतो. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्या अध्ययन क्षमतेनुसार अध्यापन केले तर शिक्षण अधिक परिणामकारक ठरते.
त्यांनी शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी अभिनंदन फलक, पालकांशी सातत्यपूर्ण संपर्क, गृहभेटी आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर निश्चित करून त्यानुसार अध्यापनाची योजना तयार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
शिक्षकांनी वेळेपूर्वी शाळेत उपस्थित राहणे, शालेय वेळेत मोबाईलचा अनावश्यक वापर टाळणे, विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ देणे, अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या गृहभेटी घेणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेणे आणि शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण करणे यासारख्या बाबींवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यासोबतच इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन शिक्षकांनी स्वतःचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवावे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक बोलण्याचा आणि सरावाचा अवसर द्यावा, असे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण अधिक प्रभावी बनविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रवेश करत असून शिक्षकांनी AI ला स्पर्धक न मानता अध्यापनातील प्रभावी सहकारी म्हणून स्वीकारले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी AI चा योग्य वापर कसा करता येईल, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शिक्षण प्रक्रियेत होत असलेले बदल, अनुभवाधारित शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, बहुभाषिक शिक्षण, मूल्यमापनातील बदल, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन आणि शिक्षकांची बदलती भूमिका या विषयांवर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले. आजच्या बदलत्या काळात शिक्षकांनी सतत अध्ययन करून स्वतःला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

