अमरावती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज, सोमवार (दि. २९ जून २०२६) महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
बैठकीत नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले वेळेत, अचूक आणि नियमानुसार उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच चुकीच्या पद्धतीने दाखले देणे किंवा नियमबाह्य कामकाज आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही महापौरांनी दिले.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि जन्म-मृत्यू दाखले वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीस सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेवक आशिष अतकरे, अॅड. प्रशांत देशपांडे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, जन्म-मृत्यू विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा आत्राम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी विभागांमध्ये समन्वय वाढविणे, तक्रारींचे तातडीने निराकरण करणे आणि जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर विशेष भर देण्यात आला.
