अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीकडून मा. महापौरांना निवेदन

अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीच्या वतीने अमरावती महानगरपालिकेकडून कोचिंग क्लासेसना देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा (फायर सेफ्टी) नोटिसीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी मा. महापौर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत शासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्यास समिती सकारात्मक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र, शहरातील अनेक कोचिंग क्लासेस भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत असून, इमारतीतील अनेक अग्निसुरक्षा उपाययोजनांची जबाबदारी इमारत मालकांवर असल्याने सर्व अटींची तत्काळ पूर्तता करणे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे समितीने म्हटले आहे.

या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती करण्यात आली.

समितीने लहान व मध्यम स्वरूपाच्या कोचिंग क्लासेसना फायर ऑडिटमधून सवलत देऊन केवळ अग्निशामक यंत्र (फायर एक्स्टिंग्विशर) बसविण्याची परवानगी द्यावी, अशी विशेष मागणी केली आहे.

याशिवाय आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजनांसाठी मुदतवाढ, इमारत मालक व क्लास चालकांची संयुक्त बैठक, व्यावहारिक कार्यपद्धती निश्चित करणे तसेच कठोर कारवाईपूर्वी आवश्यक संधी देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिक्षकांचा रोजगार आणि शैक्षणिक संस्थांचे अस्तित्व सुरक्षित राहावे यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीने व्यक्त केली आहे.

मा. महापौरांनी संघर्ष समितीचे निवेदन स्वीकारून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कोचिंग क्लासेसच्या अडचणी व मागण्या सकारात्मकपणे विचारात घेतल्या जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.

तसेच या विषयावर संबंधित अधिकारी, अग्निशमन विभाग, प्रशासन, इमारत मालक व कोचिंग क्लास प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करून व्यावहारिक आणि सर्वांना मान्य होईल असा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नियमांचे पालन करताना कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि लहान-मध्यम कोचिंग क्लासेसना न्याय मिळेल, यासाठी महानगरपालिका आवश्यक ते सहकार्य करेल, असे आश्वासन मा. महापौरांनी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top