स्वच्छ, हरित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक अमरावती शहर घडविण्याच्या उद्देशाने तसेच महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा, २००६ आणि राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या अविघटनशील वस्तूंवरील वापरबंदीबाबत जारी केलेल्या अधिसूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ३० जून) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहरातील व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, कॅटरिंग व्यावसायिक आणि विविध व्यावसायिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक बंदीच्या नियमांचे काटेकोर पालन, पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारी ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
कार्यशाळेस महापौर श्रीचंद तेजवानी, मनपा आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय दे. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी डॉ. योगिनी बाळंखे, क्षेत्र अधिकारी डॉ. प्रियश्री देशमुख, जितेंद्र पुरते आणि विशाल जाधव यांनी उपस्थित राहून प्लास्टिक बंदी कायद्याच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या प्रस्तावनेत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सांगितले की, प्लास्टिक प्रदूषण ही वाढती पर्यावरणीय समस्या असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
प्लास्टिक बंदी संदर्भातील शासनाच्या नियमांची व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, कॅटरिंग व्यावसायिक तसेच सर्व संबंधित घटकांना सविस्तर माहिती मिळावी आणि नियमांविषयी कोणताही संभ्रम राहू नये, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, व्यापारी व व्यावसायिकांनी शासनाच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करून अमरावती शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच अमरावती महानगरपालिका जनजागृती, तपासणी आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, कॅटरिंग व्यावसायिक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, दुकानदार, विविध व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी, अमरावती महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके यांच्यासह सर्व जेष्ठ स्वास्थ निरीक्षक व स्वास्थ निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रश्न विचारून अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शनही घेतले.
कार्यशाळेदरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत शासनाने कोणत्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातली आहे, कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर नियमांनुसार परवानगीयोग्य आहे, शासनाच्या अधिसूचना, कायदेशीर तरतुदी, उत्पादक, वितरक, विक्रेते, व्यापारी आणि ग्राहक यांच्या जबाबदाऱ्या याबाबत सखोल माहिती दिली. तसेच प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण, नद्या, जलस्रोत, वन्यजीव, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचे उदाहरणांसह विवेचन करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी एकेरी वापरातील (सिंगल यूज) प्लास्टिक वस्तूंवरील बंदी, प्लास्टिक कॅरीबॅगसाठी लागू असलेले मायक्रॉन निकष, पुनर्वापरयोग्य प्लास्टिकच्या वापराबाबतचे नियम, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य विलगीकरण, संकलन, वाहतूक, पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) तसेच अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रांकडे प्लास्टिक कचरा सुपूर्द करण्याची कार्यपद्धती याबाबतही सविस्तर माहिती दिली. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास पर्यावरणीय हानी मोठ्या प्रमाणात कमी करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणारी दंडात्मक कारवाई, तपासणीची प्रक्रिया, प्रतिबंधित वस्तूंची जप्ती, दंडाची तरतूद आणि संबंधित कायदेशीर बाबी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
व्यापारी व व्यावसायिकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे समाधान करून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करताना कोणत्या बाबींची विशेष काळजी घ्यावी, याबाबतही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धनासाठी शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
प्लास्टिक प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर सार्वजनिक आरोग्याचीही गंभीर समस्या बनली असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन, व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करून स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त अमरावती घडविण्यासाठी प्रत्येकाने आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
अमरावती महानगरपालिकेने शहरातील सर्व व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, कॅटरिंग व्यावसायिक, दुकानदार, व्यावसायिक संस्था तसेच सर्व नागरिकांना शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिबंधित प्लास्टिक वस्तूंचा वापर, साठवणूक, विक्री, वितरण अथवा पुरवठा टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले.
तसेच स्वच्छ, हरित आणि शाश्वत अमरावतीच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकाने प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने सर्वांनी नियमांचे प्रामाणिकपणे पालन करून पर्यावरण संरक्षणाच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही अमरावती महानगरपालिकेतर्फे करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सांगितले की, प्लास्टिक प्रदूषण ही आजच्या काळातील गंभीर पर्यावरणीय समस्या असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन, प्रशासन, व्यापारी आणि नागरिकांनी सामूहिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे.
स्वच्छ, सुंदर आणि हरित अमरावती शहराच्या निर्मितीसाठी प्रत्येक व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट व व्यावसायिकांनी शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांचे काटेकोर पालन करावे. पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करून पुढील पिढीसाठी सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून त्यासाठी व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रतिबंधित प्लास्टिक वस्तूंचा वापर, साठवणूक, विक्री आणि वितरण पूर्णपणे टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
अमरावती महानगरपालिका प्लास्टिकमुक्त शहराच्या उद्दिष्टासाठी सातत्याने जनजागृती, तपासणी आणि अंमलबजावणीची मोहीम राबविणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणाचे सामाजिक उत्तरदायित्व ओळखून स्वच्छ, हरित आणि शाश्वत अमरावतीच्या निर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
