अमरावतीतील अतिगर्दीच्या इमारतींच्या अग्निसुरक्षेवर महत्त्वपूर्ण बैठक; १५ दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश

शहरातील अतिगर्दीच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये आणि नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आज बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील विविध प्रकारच्या सार्वजनिक इमारतींमधील अग्निशमन सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये, मॉल, हॉटेल, बाजारपेठा, रुग्णालये, मंगल कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असणाऱ्या इतर व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन कितपत केले जात आहे, यावर सखोल चर्चा करण्यात आली.

अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध आहेत का, अग्निशमन यंत्रांची नियमित तपासणी केली जाते का, तसेच अग्निशमन विभागाकडून आवश्यक परवानग्या व ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्यात आले आहे का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत संबंधित विभागांनी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, असे निर्देश दिले.

शहरातील सर्व गर्दीच्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यामधील अग्निशमन सुविधांची तपासणी करण्यात यावी आणि ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील, त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून शहरातील गर्दीच्या इमारतींची अद्ययावत नोंदणी करण्याचे निर्देश दिले.

प्रत्येक इमारतीची अग्निसुरक्षा स्थिती, उपलब्ध यंत्रणा, सुरक्षाविषयक सुविधा आणि नियमांचे पालन यासंदर्भातील सविस्तर अहवाल तयार करून तो १५ दिवसांच्या आत महानगरपालिकेकडे सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर शहरातील अतिगर्दीच्या इमारतींसाठी अग्निसुरक्षा संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure – एस.ओ.पी.) तयार करण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले.

या एस.ओ.पी.मध्ये इमारतींमध्ये आवश्यक असलेल्या अग्निसुरक्षा सुविधांची किमान मानके, आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही, जबाबदार अधिकाऱ्यांची कर्तव्ये, नियमित तपासणीची प्रक्रिया, अग्निशमन यंत्रणेची देखभाल, मॉक ड्रिलचे नियोजन तसेच नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची कार्यपद्धती यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत शहरातील सर्व सार्वजनिक व व्यावसायिक इमारतींचे वर्गीकरण करून त्यानुसार तपासणी मोहीम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

अग्निशमन विभाग, नगररचना विभाग आणि इतर संबंधित विभागांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून आवश्यक ती माहिती संकलित करावी, तसेच ज्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

याशिवाय इमारत मालकांनी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देणे, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे आणि अग्निशमन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे बैठकीत करण्यात आले.

अमरावती महानगरपालिकेने शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत ही बैठक महत्त्वपूर्ण घेण्‍यात आली.

नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे आणि अग्निसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top