समन्‍वयाने काम करुन नागरिकांच्‍या समस्‍या तत्‍काळ सोडवा : महापौर श्रीचंद तेजवानी

अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली.

शहरातील विविध विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा, प्रलंबित कामे, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम, उद्यान, विद्युत व्यवस्था तसेच इतर विभागांच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत महापौरांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत सेवा देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असून, त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी विभाग प्रमुखांना परस्पर समन्वय वाढवून काम करण्याचे निर्देश दिले. अनेक विकासकामे ही एकापेक्षा अधिक विभागांशी संबंधित असतात.

त्यामुळे विभागांमध्ये योग्य संवाद आणि नियोजन असल्यास कामांना गती मिळेल, अनावश्यक विलंब टळेल आणि नागरिकांनाही त्याचा थेट लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी महापौरांनी प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभागांच्या नगरसेवकांशी नियमित संपर्क ठेवावा, त्यांच्या सूचनांना प्राधान्य द्यावे आणि विकासकामे लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले.

नागरिकांच्या अडचणी सर्वप्रथम नगरसेवकांमार्फत प्रशासनापर्यंत पोहोचतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय राहणे आवश्यक असून, विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवादाचा अभाव राहू नये, असे त्यांनी सांगितले.

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याबरोबरच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, रस्त्यांची देखभाल, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित उपाययोजना तसेच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रत्येक विभागाने आपल्या कामाचे नियोजन निश्चित वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि प्रलंबित कामांचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान विविध विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली. तसेच विकासकामांमधील अडचणी, प्रलंबित प्रस्ताव आणि भविष्यातील नियोजनाबाबत महापौरांना माहिती देण्यात आली. त्यावर महापौरांनी आवश्यक त्या सूचना देत कामकाज अधिक गतिमान करण्यावर भर दिला.

महानगरपालिकेचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे काम केल्यास शहराचा विकास अधिक वेगाने होईल आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देता येतील, असा विश्वास व्यक्त करत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सर्व विभाग प्रमुखांना जबाबदारीने, पारदर्शकपणे आणि समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले.

या आढावा बैठकीस उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top