राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. श्रीमती विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महिला बचत गटांच्या सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
बैठकीत महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
संबंधित अधिकाऱ्यांनी बचत गटांच्या प्रगतीसह भविष्यातील नियोजनाचे सादरीकरण केले.
यावेळी मार्गदर्शन करताना विजया रहाटकर म्हणाल्या की, महिला बचत गट हे ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे.
महिलांना उद्योग, व्यवसाय, प्रशिक्षण, विपणन सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळणे आवश्यक आहे.
देशभरात सुमारे एक कोटी महिला बचत गट कार्यरत असून त्यांच्याशी कोट्यवधी महिला जोडल्या गेल्या आहेत. ‘लखपती दीदी’ योजनेमुळे अनेक महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच ‘जेम’ (GeM) पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकेने बचत गटांसाठी आधुनिक विक्री स्टॉल उभारावेत तसेच अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांसाठी निधीची तरतूद करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
बैठकीत बचत गटांना भेडसावणाऱ्या अडचणी, वित्तीय सहाय्य, कर्ज उपलब्धता, उत्पादनांचे ब्रँडिंग, बाजारपेठ, डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याबाबत चर्चा झाली.
महिला बचत गटांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीपूर्वी विजया रहाटकर यांनी महानगरपालिकेच्या परिसरात महिला बचत गटांनी उभारलेल्या उत्पादन प्रदर्शनाला भेट दिली.
स्टॉलवरील विविध उत्पादनांची पाहणी करून त्यांनी महिलांच्या कौशल्याचे कौतुक केले आणि उत्पादने उत्कृष्ट दर्जाची असल्याचे नमूद केले.
या बैठकीस महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, लोकप्रतिनिधी, अधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


