अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज, सोमवार दि. १३ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी करून विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला.
प्रशासनाची सद्यस्थिती, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, प्रलंबित कामे, विकासकामांची अंमलबजावणी तसेच कार्यालयीन कार्यपद्धतीची माहिती त्यांनी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
पाहणीदरम्यान आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांनी विविध विभागांच्या कार्यालयांना भेट देत तेथील दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली.
प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सेवांचा आढावा घेतला.
विविध विभागांमध्ये सुरू असलेली कामे, त्यांची प्रगती, प्रलंबित प्रस्ताव, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणाची प्रक्रिया याबाबत त्यांनी माहिती घेतली.
यावेळी त्यांनी कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि परिणामकारक करण्यावर भर दिला.
नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही नागरिकाला विनाकारण कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत, अर्ज व तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सेवा वितरण अधिक प्रभावी करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेताना निधीचा प्रभावी वापर, कामांची गुणवत्ता आणि निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच स्वच्छता, आरोग्य, कर वसुली, बांधकाम परवानग्या, अभियांत्रिकी, नगररचना, लेखा, माहिती तंत्रज्ञान आणि नागरिक सेवा केंद्रांमधील कामकाज अधिक कार्यक्षम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना प्रशासनातील संघभावना, उत्तरदायित्व आणि लोकाभिमुख दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने काम करावे, शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि शहराच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे त्यांनी नमूद केले.
पाहणीदरम्यान विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील विविध उपक्रम, उपलब्ध सुविधा, अडचणी तसेच भविष्यातील नियोजनाची माहिती आयुक्तांसमोर मांडली.
त्यावर आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांनी आवश्यक त्या सूचना देत प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन त्यांची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त श्रीकांतसिंह चौव्हान, भुषण पुसतकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा सांख्यिकी अधिकारी अक्षय निलंगे, मा.आयुक्त यांचे स्विय सहाय्यक चेतन मेश्राम उपस्थित होते.

