अमरावती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागामध्ये जन्म अथवा मृत्यूची घटना घडून १ महिना ते १ वर्ष कालावधी झालेल्या प्रकरणांसह सन २०१६ पूर्वीच्या Add Old Event प्रकरणांची नोंद दैनंदिन स्वरूपात ऑनलाइन पोर्टलद्वारे जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येते.
या प्रकरणांना संबंधित कार्यालयाकडून मंजुरी (Approval) प्राप्त झाल्यानंतरच संबंधित नागरिकांना जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करता येते.
मात्र मंजुरी प्रक्रियेस अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागत असल्याने नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज, दि. १३ जुलै २०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे तसेच सन्माननीय नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे यांनी डॉ. सत्यम गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी प्राप्त होणाऱ्या जन्म-मृत्यू नोंदणीच्या प्रकरणांवर प्राधान्याने कार्यवाही करून, ती अल्पावधीत व शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली.
नागरिकांना जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे, त्यांची गैरसोय टळावी आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली.
