गाडगेनगर, नवसारी कचरा स्पॉट व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; समन्वयातून नियोजनबद्ध कामाचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी गाडगेनगर परिसर, नवसारी येथील कचरा संकलन स्थळ (कचरा स्पॉट) आणि नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.

सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाहणीची सुरुवात गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पीडीएमसी प्रभागातील नगरसेवक प्रमोद महल्ले यांनी सर्व प्रभागातील नगरसेवकांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांचे स्वागत केले.

तसेच सर्व नगरसेवकांनी परिसरातील विविध नागरी समस्या, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि विकासकामांबाबतच्या अडचणी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करून समस्या सोडविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

त्यानंतर परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करत आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा आदर्श ठेवून शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवणे ही महानगरपालिकेसह नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर नवसारी येथील कचरा स्पॉटची पाहणी करत त्यांनी कचरा संकलन, विल्हेवाट आणि व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेतला.

कचरा साचून राहणार नाही, परिसरात अस्वच्छता निर्माण होणार नाही आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया अधिक प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती घेत आयुक्तांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.

नागरिकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता निर्धारित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आयुक्तांनी स्वच्छता मोहिमांमध्ये विभागांतील समन्वय अधिक मजबूत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

प्रत्येक कामाचे योग्य नियोजन करून जबाबदाऱ्या निश्चित करणे, नियमित आढावा घेणे आणि वेळेत कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करून अमरावती अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त शहर बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पीडीएमसी प्रभागातील नगरसेवक प्रमोद महल्‍ले यांनी सर्व प्रभागातील नगरसेवकांच्‍या वतीने महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले यांचे स्‍वागत केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top