अमरावतीत भटक्या कुत्रे व रस्त्यावरील जनावरांविरोधात धडक मोहीम; पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याचे आवाहन

शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरात भटके कुत्रे व रस्त्यावरील जनावरे पकडण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला सर्व विभागांत वेग देण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या विशेष पथकांकडून विविध प्रभागांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत कारवाई केली जात आहे. आज, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी या मोहिमेदरम्यान एकूण २१ भटके श्वान पकडण्यात आले.

रस्त्यांवर मोकाट फिरणारे कुत्रे, जनावरे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्राण्यांना पकडून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे.

शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा, शाळा, रुग्णालय परिसर आणि वर्दळीच्या भागांमध्ये या मोहिमेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

महानगरपालिकेने पाळीव कुत्रे असलेल्या नागरिकांसाठीही महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ज्या नागरिकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांची महानगरपालिकेकडे अधिकृत नोंदणी केलेली नाही, अशा कुत्र्यांना पाळीव म्हणून मान्यता दिली जाणार नाही.

त्यामुळे अशा प्राण्यांवरही नियमानुसार कारवाई होऊ शकते. नागरिकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ आपल्या पाळीव कुत्र्यांची नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करावीत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी स्वतः विविध भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत मोहिमेत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

नियोजनबद्ध आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश देत प्रत्येक प्रभागात नियमित तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महानगरपालिका प्रशासनाच्या मते, शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा तसेच नागरिकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अनेक भागांत नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत तसेच मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

अमरावती महानगरपालिका, अमरावती तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरातील मोकाट अथवा पिसाळलेल्या श्वानांच्या तक्रारी तसेच मोकाट जनावरांच्या तक्रारींसाठी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा.

यासाठी श्री. निलेश सोळंके (पशुधन निरीक्षक) – मो. ७०३०९४०२२७ तसेच श्री. पंकज कल्याणकर (स्‍वा. निरीक्षक) – मो. ९८६०२३८९१४ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top