अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्याने, नागरिक सुविधा तसेच परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेतला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून करण्यात आली. आयुक्तांनी येथून पुढे पायदळ फेरफटका मारत संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व परिसराची पाहणी केली.
यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मालवीय चौक येथील नाल्याची पाहणी करताना नाल्यात कचरा टाकणाऱ्या हॉकर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जयस्तंभ चौक परिसराची पाहणी करताना घुमंतूंवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच चौधरी चौक रोडवरील ज्या ठिकाणी कचरा साचतो, तो कचरा त्वरित उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राजकमल चौक परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.
अंबादेवी परिसरातील अंबा नाल्याचीही आयुक्तांनी पाहणी केली. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाची पाहणी करून त्याचा नागरिकांसाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल, याबाबत विचारमंथन करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर आयुक्तांनी प्रशांत नगर येथील उद्यानाला भेट दिली. या उद्यानातील विविध समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.
नागरिकांसाठी हे उद्यान अधिक चांगले व आकर्षक करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध नेहरू मैदानाचीही आयुक्तांनी पाहणी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुमंतू आढळून आल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या तसेच परिसरात शिस्त व स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या नर्सरीला भेट देऊन तेथील उपलब्ध झाडे, रोपे तसेच वृक्षारोपणाच्या नियोजनाची माहिती जाणून घेतली.
शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी उपलब्ध रोपांचा योग्य वापर करून नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी झोन क्रमांक २ मधील विविध प्रलंबित समस्यांची माहिती लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना दिली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.



