अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष रात्रकालीन धडक कारवाई करत सुमारे 600 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त केले.
ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या निर्देशानुसार 17 जुलै 2026 रोजी करण्यात आली.
मनपाला दूरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, यवतमाळ येथून चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य अमरावतीत आणले जात असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे रात्री सुमारे 11 वाजता पटवा चौक (मसानगंज) परिसरात सापळा रचून संबंधित वाहन अडविण्यात आले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 21 पोत्यांमध्ये भरलेले अंदाजे 600 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य आढळून आले. मनपा पथकाने संपूर्ण साहित्य जप्त करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अतिक्रमण विभागाकडे जमा केले.
या कारवाईदरम्यान स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे, प्लास्टिक बंदी नोडल अधिकारी ए. के. गोहर, प्लास्टिक बंदी स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
