न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी

अमरावती शहरातील न्यू गणेश कॉलनी परिसरात सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग बंद करून त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्या गंभीर तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

या पाहणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, न्यू गणेश कॉलनीतील हे मंदिर गेल्या दोन शतकांपासून परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

दररोज अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि इतर धार्मिक उत्सवांच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.

मात्र मंदिराकडे जाणारा पारंपरिक सार्वजनिक मार्ग अडवून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने भाविकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

याच परिसरात असलेले विशाल आणि अनेक दशकांपासून परिसराची ओळख असलेले वडाचे वृक्ष हे पर्यावरणीय तसेच धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनधिकृत बांधकामामुळे या वृक्षाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला असून परिसरातील नैसर्गिक वारसा धोक्यात आला आहे.

त्यामुळे वडाचे वृक्ष आणि मंदिराचा मार्ग दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली.

महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली.

जागेची स्थिती, बांधकामाचे स्वरूप, सार्वजनिक मार्गाची सद्यस्थिती तसेच उपलब्ध कागदपत्रांची प्राथमिक माहिती त्यांनी जाणून घेतली.

नागरिकांनीही आपल्या समस्या आणि तक्रारी यावेळी महानगरपालिका प्रशासनासमोर मांडल्या.

पाहणीनंतर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकामाची कायदेशीर स्थिती तपासण्यात यावी, सार्वजनिक मार्ग अडविला गेला असल्यास नियमानुसार आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी आणि मंदिराकडे जाणारा मार्ग पूर्ववत खुला करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिका प्रशासनाकडून केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सार्वजनिक जागा, धार्मिक स्थळांकडे जाणारे मार्ग आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे संरक्षण करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनधिकृत बांधकामामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांना प्रोत्साहन मिळू नये, यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणीही करण्यात आली.

या पाहणी मध्य झोन सभापती स्वाती कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, भूषण पाटणे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, मंगेश कडू, मालमत्ता अधिकारी सचिन मांडवे, उपअभियंता दिनेश हंबर्डे, हेमंत महाजन, अभियंता लक्ष्मण पावडे, न्यू गणेश कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top