स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महानगरपालिकेचा पुढाकार

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. २० जुलै) झोन क्र. ३ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, नाल्यांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

पाहणीदरम्यान संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत शहरात स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आयुक्त डॉ. गोंदावले यांनी मधुबन ले-आऊट, साधना कॉलनी, यशोदा नगर चौक, दस्तुरनगर चौक, संजय गांधी नगर क्रमांक १ व २, फ्रेजरपुरा स्मशानभूमी परिसराची पाहणी केली.

या भागांतील नाल्यांची साफसफाई, रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा, पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि स्वच्छता व्यवस्थेचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला.

पावसाळ्यात नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात.

अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी सर्व नाल्यांची नियमित साफसफाई करण्याचे, गाळ तातडीने उचलण्याचे आणि पाण्याचा निचरा सुरळीत राहील यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.

ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत, ते तातडीने दूर करून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

स्वच्छता मोहिमेचा आढावा घेताना शहरातील प्रत्येक भागात दररोज नियमित कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा उघड्यावर पडू न देणे आणि स्वच्छतेच्या कामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.

नागरिकांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी आकाशवाणी केंद्राजवळील परिसर व सर्किट हाऊस परिसरातील लाल बंगला येथे नव्याने कचरा संकलन केंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित जागेचीही पाहणी करण्यात आली.

शहरातील वाढत्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी आणि कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी या केंद्राची उभारणी महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रस्तावित केंद्रामुळे संबंधित परिसरातील कचरा संकलन प्रक्रिया अधिक वेगवान, नियोजनबद्ध आणि परिणामकारक होण्यास मदत होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुख, अभियंते आणि स्वच्छता अधिकाऱ्यांशी विविध कामांबाबत चर्चा केली.

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, स्वच्छता आणि नाल्यांच्या साफसफाईत कोणताही विलंब होऊ देऊ नये तसेच नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्याने प्रतिसाद द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

महानगरपालिका प्रशासन शहराला स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना राबवत असून, स्वच्छता व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी नियमित पाहणी, प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जात आहे.

या पाहणीमुळे झोन क्र. ३ मधील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच शहरातील नागरिकांनीही कचरा उघड्यावर न टाकता महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top