अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच श्वान दहन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी कंपोस्ट डेपोमध्ये दररोज संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या
कचऱ्याच्या वर्गीकरणाची प्रक्रिया, सेंद्रिय खत निर्मितीची कार्यपद्धती, कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट, डेपोतील स्वच्छता, यंत्रसामग्रीची स्थिती तसेच मनुष्यबळाच्या कार्यपद्धतीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
|
कंपोस्ट निर्मितीची प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी बायोमायनिंग तसेच सॅनिटरी लँडफिलसाईट डेव्हलपमेन्ट बाबत माहिती जाणून घेतली. घनकचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या बायो प्रोडक्ट जसे आरडीएफ खत व इतर वस्तू त्याचे विल्हेवाट लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.
डेपो परिसरात स्वच्छता राखणे, कचऱ्याची साठवण योग्य पद्धतीने करणे, दुर्गंधी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे, पावसाळ्यात साचणारे पाणी रोखण्यासाठी आवश्यक नियोजन करणे तसेच पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याने कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर आयुक्तांनी सुकळी येथील श्वान दहन केंद्राची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता, दहन प्रक्रिया आणि उपलब्ध यंत्रणेची माहिती घेतली.
भटक्या व मृत श्वानांची विल्हेवाट वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने लावली जात आहे का, याची त्यांनी खात्री केली.
दहन केंद्राचे कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित व नियमानुसार राहावे, यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी आयुक्तांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि देखभाल यावर विशेष भर देत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले.
महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध कामांचा आढावा घेतला आणि प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


