शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज (दि. २४ जुलै) दक्षिण झोन क्र. ४ अंतर्गत विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
पाहणी दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्र. २२ मधील बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून करण्यात आली.
या ठिकाणी बाजार परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा, रस्त्यांची स्थिती आणि अतिक्रमणाची परिस्थिती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
त्यानंतर मटन मार्केट परिसराची पाहणी करून तेथील स्वच्छता व्यवस्था, आरोग्यविषयक बाबी आणि व्यापाऱ्यांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली.
रजा नगर परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची तातडीने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यानंतर आयुक्तांनी प्रभाग क्र. २१ मधील आलमास गेट चौकाची पाहणी केली. वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर महानगरपालिका उर्दू शाळा क्र. ३ व १० येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची स्थिती, परिसरातील स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा तसेच आवश्यक दुरुस्तीच्या कामांची माहिती घेतली.
प्रभाग क्र. २० मधील सुतगिरणी परिसरातील गोपाल नगर टी-पॉइंट, जेवड महानगरपालिका शाळा आणि सामरा नगर परिसराचीही सखोल पाहणी करण्यात आली.
या भागातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, गटारी, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी जुनी वस्ती येथील महानगरपालिका शाळेच्या खुल्या भूखंडाची पाहणी केली. या जागेचा योग्य वापर, परिसराची स्वच्छता आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
तसेच जीर्णावस्थेत असलेल्या महानगरपालिका शाळेची पाहणी करून इमारतीच्या सुरक्षिततेचा आढावा घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी शहरातील स्मशानभूमी परिसराचीही पाहणी करण्यात आली. परिसरातील स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि नागरिकांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली.
स्मशानभूमी परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
श्रीकृष्ण मंदिर परिसरातही आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली. सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता व शिस्त राखण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या संपूर्ण पाहणी दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी स्वच्छता, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, अतिक्रमण आणि सार्वजनिक सुविधांबाबत विविध समस्या मांडल्या.
संबंधित विभागांनी या समस्यांचे तातडीने निराकरण करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.
शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचे प्रत्यक्ष पाहणी दौरे सातत्याने राबविण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



