महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. २७ जुलै) नागपुरी गेट परिसरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाल्यांची स्थिती, रस्त्यांची स्वच्छता, अतिक्रमणाची परिस्थिती तसेच विविध नागरी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांनी पाहणीची सुरुवात नागपुरी गेट परिसरातून केली. परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग, सार्वजनिक ठिकाणे आणि नाल्यांची पाहणी करून साफसफाईची गुणवत्ता तपासली. पावसाळ्यात पाणी साचणार नाही यासाठी नाल्यांमधील गाळ व कचरा नियमितपणे काढण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच जनजागृतीही प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यानंतर आयुक्तांनी नागपुरी गेट येथील महानगरपालिका शाळा क्र. ३ ला भेट देऊन शाळेच्या परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची पाहणी केली.
शालेय परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
ट्रान्सपोर्ट परिसरातील कचरा संकलन केंद्राची पाहणी करताना आयुक्तांनी कचरा संकलन, वर्गीकरण व विल्हेवाट प्रक्रियेचा आढावा घेतला.
शहरातील कचरा वेळेवर उचलला जावा, कचरा संकलन केंद्रात अनावश्यक साठा होऊ नये तसेच दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नियोजन, नियमित फेऱ्या आणि यंत्रणेमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यावरही त्यांनी भर दिला.
लालखडी रिंग रोड व लालखडी पुलाची पाहणी करताना रस्त्यांच्या दुतर्फा असलेली स्वच्छता, नाल्यांची स्थिती, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि अतिक्रमणाची परिस्थिती यांचा आढावा घेण्यात आला.
वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण तातडीने हटविण्याचे तसेच रस्ते व पुलांच्या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
त्यानंतर झोन कार्यालय व भाजीबाजार परिसरात स्वच्छतेची पाहणी करण्यात आली.
बाजारपेठेत निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, व्यापाऱ्यांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ ठेवणे तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकला जाणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बाजारपेठेत नागरिक व व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.
ट्रान्सपोर्ट नगर येथील अग्निशमन केंद्रालाही आयुक्तांनी भेट देऊन तेथील परिसराची स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.
आपत्कालीन सेवा अधिक सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा कार्यरत राहतील याची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी स्वच्छता ही केवळ मोहिम न राहता ती दैनंदिन कार्यपद्धतीचा भाग बनली पाहिजे, असे स्पष्ट करत प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले.
नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे, नियमित क्षेत्रीय पाहणी करणे, नाले स्वच्छ ठेवणे, कचरा वेळेवर उचलणे आणि अतिक्रमणाविरोधात सातत्यपूर्ण मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.



