अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट स्थापना दिन यंदा सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम ठरणाऱ्या विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी माननीय महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेत्यांच्या कक्षात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थापना दिन साजरा करण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीस उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शेख वाहेद, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत स्थापना दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता “जनतेचा उत्सव – शहराच्या विकासाचा संकल्प” या भावनेतून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा यासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनकल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
१४ ऑगस्ट रोजी शहरभर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे व नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे. याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून युवकांनी व सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले.
१५ ऑगस्ट रोजी स्थापना दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व माजी महापौरांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
तसेच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून शहरातील कलाकार, विद्यार्थी आणि विविध सांस्कृतिक संस्थांकडून देशभक्तीपर, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. स्वातंत्र्यदिन आणि महानगरपालिका स्थापना दिन या दुहेरी पर्वाचे औचित्य साधणारा हा सोहळा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
स्थापना दिनानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार असून आवश्यक पूर्वतयारी आणि नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले.
यावेळी शहरातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, युवक मंडळे तसेच सर्व नागरिकांनी स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
“अमरावती महानगरपालिकेचा स्थापना दिन हा शहराच्या विकासाचा, सामाजिक एकात्मतेचा आणि लोकसहभागाचा प्रेरणादायी उत्सव ठरावा,” अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
