शहरातील नागरिकांना दर्जेदार व परिणामकारक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या दस्तूरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ९ (एस.आर.पी.एफ.-वडाळी) येथे विविध विकासकामांची आणि नागरी सुविधांची सविस्तर पाहणी केली.
या पाहणीदरम्यान स्वच्छता व्यवस्था, रस्ते बांधकाम, महानगरपालिका शाळा, मनपा दवाखाना तसेच परिसरातील इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व निर्देश देण्यात आले.
पाहणीची सुरुवात परिसरातील स्वच्छता व्यवस्थेपासून करण्यात आली. विविध रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाल्या आणि कचरा संकलन व्यवस्थेची पाहणी करत आयुक्तांनी स्वच्छतेच्या कामात कोणतीही हलगर्जी होऊ नये, नियमित साफसफाई करण्यात यावी तसेच नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना स्वच्छता विभागाला दिल्या.
कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट प्रक्रियेत अधिक कार्यक्षमतेने काम करण्यावर त्यांनी भर दिला.
यानंतर परिसरात सुरू असलेल्या रस्ते बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांना देण्यात आले.
रस्ते बांधकामामुळे नागरिकांना कोणताही अनावश्यक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका शाळेला भेट देत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था आणि परिसरातील सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मनपा दवाखान्याच्या पाहणीदरम्यान आरोग्य सेवा, औषधांचा साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच दवाखान्याची स्वच्छता याची तपासणी करण्यात आली.
नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत दवाखान्याच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता आणण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
पाहणीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परिसरातील विविध समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रलंबित विकासकामांबाबत आयुक्तांचे लक्ष वेधले.
त्यावर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखून विकासकामांना गती देण्यावर त्यांनी भर दिला.
पाहणीच्या शेवटी आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरी सुविधांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्याचे, स्वच्छता व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे तसेच विकासकामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.
शहरातील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारच्या नियमित पाहण्या करून कामांचा आढावा घेतला जाणार असून, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी प्रभागाच्या नगरसेविका ममता संदीप आवारे, पंचफुला चव्हाण तसेच नगरसेवक विक्की वानखडे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक मोहित जाधव, अमरावती शहर समन्वयक श्वेता बोके तसेच कोणार्क साफसफाई कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.


